‘स्मार्ट नवी मुंबई मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ चा 7 मार्चला भव्य शुभारंभ

सुनियोजित व आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वदूर नावलौकीक होत असताना येथील नागरी सुविधांचा दर्जा नागरिकांना समाधानकारक असण्यासोबतच त्या पुरविताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत विविध प्रकल्पांत दूरदृष्टीचे नियोजन ठेवल्यामुळे आधुनिक नवी मुंबई आता स्मार्ट सिटी साठी आवश्यक मानदंड पूर्ण करण्याकडे झपाट्याने झेपावताना दिसत आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस सुजाण नवी मुंबईकर नागरिकांचे संपूर्ण सहकार्य लाभते आहे. म्हणूनच आगामी काळात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून स्मार्ट सिटीचे उदि्दष्ट गाठण्यासाठी एका निश्चित ध्येयाकडे नियोजनबध्द वाटचाल करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्मार्ट नवी मुंबई मिशन’ हाती घेण्यात येत आहे.

या मिशनच्या पहिल्या टप्प्यात ‘स्वच्छता’ हा महत्वपूर्ण विषय हाती घेण्यात येत असून दि. 7 मार्च 2015 रोजी, सायं.6 वा. कोपरखैरणे से.14 येथील निसर्गोद्यान स्थळी ‘स्मार्ट नवी मुंबई मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ चा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी माजी मंत्री, लोकनेते श्री. गणेश नाईक हे मुख्य अतिथी म्हणून तसेच ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार सौ. मंदा म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आमदार श्री. नरेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण शहर, देशापरदेशातील पर्यावरणतज्ज्ञांनी नावाजलेला व अनेक पुरस्कारांनी गौरविलेला शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी शुध्द करून पर्यावरण रक्षणाचे महत्वपूर्ण काम करणारी अत्याधुनिक सी-टेक मलप्रक्रिया केंद्रे अशा आधुनिक व शहराचा दूरगामी विचार करून आखलेल्या दूरदृष्टीच्या विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबई महानगरपालिका देशातील एक अग्रगण्य महानगरपालिका म्हणून अल्प कालावधीत नावारूपाला आली आहे व पुरस्कारांस पात्र ठरली आहे.  तसेच ‘इको सिटी’ म्हणून पर्यावरणपूरक वाटचाल करताना दिसत आहे. वास्तुरचनेचा देशातील एक अप्रतिम नमुना म्हणून ओळखल्या जाणा-या महापालिकेच्या मुख्यालय वास्तूसही नुकतेच ग्रीन बिल्डींगचे गोल्‍ड् मानांकन प्राप्त झाले असून असे मानांकन मिळविणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे.

महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू केल्याच्या पहिल्याच वर्षी राज्यातील सर्वात स्वच्छ महानगराचा सर्वप्रथम क्रमांकाचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस मिळाला असून त्यानंतरही 2007-08 वर्षातील सर्वप्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेनेच संपादन केला आहे. म्हणूनच स्मार्ट सिटीचे उदि्दष्ट नजरेसमोर ठेवून सर्वांच्या सहयोगाने त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ हाती घेण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने ‘स्मार्ट नवी मुंबई मिशन’ च्या पहिल्या टप्प्यात शहराच्या आरोग्याशी निगडीत असणा-या स्वच्छतेसारख्या महत्वपूर्ण विषयाकडे विशेष लक्ष देण्यात येत असून पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून हा कार्यक्रम से.14, कोपरखैरणे येथील जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त रितीने बंद करून त्याजागी महानगरपालिकेने फुलविलेल्या अभिनव निसर्गेाद्यानासारख्या पर्यावरणपूरक स्थळी संपन्न होत आहे.  तरी या कार्यक्रमास विविध संस्था, मंडळे यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच उद्योजक, व्यापारी, पत्रकार, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापौर श्री. सागर नाईक, महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे तसेच समस्त महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, विविध समिती सदस्य, अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published.