नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यासोबतच त्यांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध होण्यात अडचण जाणवू नये याचीही दक्षता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात येत आहे.

कोव्हिड – 19 विरोधातील लढ्यात अत्याधुनिक ‘कोव्हिगार्ड’ आणि ‘कोव्हिकेअर’ ॲपचा महापालिका करणार वापर

        कोव्हिड 19 बाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध माध्यमांचा वापर करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत असून घरीच अलगीकरण ( Home Quarantine ) करून राहात असलेल्या व्यक्तींशी सतत संपर्काच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोव्हिगार्ड’ हे विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपव्दारे घरीच अलगीकरण करून रहात असलेल्या नागरिकांच्या प्रकृतीबद्दलची माहिती संबंधित नागरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी यांना या अभिनव अॅपव्दारे जाणून घेता येणार असून त्या अलगीकरण करून घरीच रहात असलेल्या नागरिकांनाही काही शंका विचारायच्या असल्यास वा सूचना करावयाच्या असल्यास या ॲव्दारे सहजपणे करता येणार आहेत. त्याकरिता घरी अलगीकरण करून राहिलेल्या व्यक्तींनी आपल्या मोबाईलवर लिंक डाईनलोड करून घ्यावयाची असून याव्दारे त्यांच्याशी महानगरपालिका आरोग्य विभागाचा सतत संपर्क राहणार आहे.

       त्याचप्रमाणे ज्या भागात नागरिकांचा आरोग्य विषयक सर्व्हे करावयाचा आहे त्याकरिता ‘कोव्हिकेअर’ हे आणखी एक विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. याबाबतची लिंक सोसायटी / वसाहतींच्या पदाधिकारी यांचेकडे पाठविण्यात येणार असून त्यामध्ये त्यांनी तेथील नागरिकांची माहिती दाखल करावयाची आहे.

       त्यामुळे ‘नागरिकहो, तुम्ही घराबाहेर पडू नका, घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आम्ही तुमच्यापर्यंत ॲपव्दारे पोहचू” – जणूकाही असाच संदेश नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिला जात आहे. कोव्हिड – 19 विरोधातील या लढ्यात आजच्या माहिती तंत्रयुगाला साजेसे ‘कोव्हिगार्ड’ आणि ‘कोव्हिकेअर’ असे मोबाईल अॅप विकसित करून नवी मुंबई महानगरपालिकेने आधुनिक पाऊल टाकले आहे.

रूग्णालये, दवाखाने, औषध दुकाने बंद ठेवणा-यांवर आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे कारवाईचे निर्देश

        कोरोना विषाणू प्रसाराच्या काळात नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणे अतिशय महत्वाचे असून काही वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने व रूग्णालये तसेच औषंधांची दुकाने या लॉकडाऊनच्या बंद ठेवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

       ही बाब सामाजिक आरोग्यहिताय नसून याची गांभीर्याने नोंद घेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी  साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1987 अन्वये सक्षम प्राधिकारी म्हणून प्राप्त अधिकारानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच आरोग्यविषयक संबंधित आस्थापना बंद राहिल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यावसायिक व आस्थापनांवर भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

एपीएमसी मार्केट सुरू राहणार असून गर्दी न करण्याचे नागरिकांना आवाहन

       लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची जीवनावश्यक साहित्यासाठी अडचण होऊ नये याकरिता राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही स्थानिक पातळीवरून त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रात आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ अर्थात एपीएमसी मार्केट तुर्भे येथे असून त्याठिकाणी फळे, भाजीपाला, अन्नधान्य अशी पाच मार्केट आहेत. आजपासून एपीएमसी मार्केट सुरू झाले असून ते सुरूच राहणार असल्याची नोंद घेत नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. त्याठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक व तेथे कामगार येत असून तेथे गर्दी होणार नाही अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापारी, दुकानदार यांनी आपल्या दुकानात स्वच्छता राखावी व सॅनिटायझरचा वापर करावा आणि दुकानात व दुकानाबाहेर गर्दी होणार नाही, दोन ग्राहकांमध्ये योग्य सामाजिक अंतर (Social Distancing) राखले जाईल याची दक्षता घ्यावी असे निर्देशित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडताना घरातील एकाच व्यक्तीने हातरूमाल किवा मास्क हे नाक व तोंडाला बांधून घराबाहेर पडावे तसेच बाहेर पडल्यानंतर दुस-या व्यक्तीपासून किमान 1 मीटर अंतर राहिल याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

       नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सद्यस्थितीत 690 व्यक्ती घरी अलगीकरण ( Home Quarantine ) करून रहात असून 81 व्यक्ती सेक्टर 14, वाशी येथील अलगीकरण कक्षात आहेत. त्याचप्रमाणे वाशी सार्वजनिक रूग्णालयातील विलगीकरण कक्षात (Isolation Center) 06 व्यक्ती उपचार घेत आहेत.

       नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अथक कार्यरत असून संसर्ग रोखणे हा यावरील सर्वोत्तम उपाय आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या घरातच थांबून आपल्या व सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published.