कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम, 1897 ची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र शासनाच्या दि.13 मार्च 2020 पासून सुरुवात झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून कोरोना बाधीतांवर उपचार करण्यासाठी कोव्हीड केअर सेंटर, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यामध्ये कोव्हीड-19 बाधीतांवर उपचार करण्यासाठी काही खाजगी रुग्णालये निश्चित करण्यात आलेली आहेत व त्याठिकाणी कोरोना बाधीत तसेच इतर आजारांवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. हे उपचार करत असताना दि. 21 मे 2020 रोजीच्या परिपत्रकान्वये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने कोव्हीड – 19 रुग्णांवरील उपचाराचे दरपत्रक निश्चित केले असून त्यानुसारच वैद्यकीय सेवांसाठी रक्कम घेणे अनिवार्य आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने सर्व खाजगी रुग्णालयांना यापूर्वीच निर्देश देण्यात आले असून सदर रुग्णालयांनी कोव्हीड-19 रुग्णसेवेचे सुविधानिहाय दर नागरिकांना सहज दृष्टीस पडेल अशा पध्दतीने दर्शनी भागात प्रदर्शित करणे गरजेचे आहे.